वर्षा ऋतुचर्या
वर्षा ऋतुचर्या

आलेले संक्रमण पावसात वाहून जाईल का? कि पावसाळा आल्यावर रुग्ण अजूनच वाढतील? एवढ्या तफावतीचे अंदाज वर्तविले जात असताना मनात अनेक शंका, भीती, साशंकता असणे साहजिकच आहे. 

    पण आयुर्वेद या सगळ्या समस्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबतीला सतत आहे. गरज आहे ती आयुर्वेदाकडे पूर्ण विश्वास ठेवून वळण्याची. 

  आयुर्वेद केवळ रोग, औषध, बिघडलेले स्वास्थ्य याबद्दल निराकरण करणारे शास्त्र  नसून, आयुर्वेद एक शास्त्रशुद्ध निरामय जीवनशैली आहे* . प्रतिदिनी दिवसभर करण्याची कार्ये, आदर्श रित्या आयुर्वेदात विस्ताराने सांगितली आहेत, याला दिनचर्या असे म्हणतात. आणि प्रत्येक ऋतु नुसार दिनचर्येमधे विशेष असे आहार विहार बदल ज्यात सांगितले आहेत तिलाच ऋतुचर्या असे म्हणतात.  

आदान काळ संपून विसर्ग काळ लागण्याचा काळ म्हणजेच ग्रीष्म ऋतु संपून वर्षा ऋतु लागण्याची चाहूल. विसर्ग काळाची सुरुवात म्हणजेच "दक्षिणायनाची" सुरुवात. 

    

"विसृजति जनयति आप्यं अन्शं प्राणिनां च बलं इति विसर्गः |"

   ~सर्व सजीव गोष्टींना जीवन प्रदान करणारे तत्व म्हणजे जल. अशा आपल्या जलीय अंशाने प्राणिमात्रांचे विसृजन करणारा काळ, तो विसर्ग काळ.

 "आदान दुर्बले देहे पक्ता भवति दुर्बलः|
     स वर्षासु अनिलादिनां दुषणैः बाध्यते पुनः||"

     ग्रीष्म ऋतूतील उष्णता, काहिली आणि आदानकाळातील बल हानी यांनी क्षीणलेल्या मनावर व शरीरावर वर्षा सरींच्या शिडकाव्याने आल्हाददायी वातावरण तर निर्माण होते. परंतु, आदानकाळात (वर्षा ऋतुच्या आधीच्या काळात) उष्णतेच्या योगाने शरीरातील रस आणि स्नेह शोषले गेल्याने  शरीरातील अग्नी (संपूर्ण शरीराची पचन शक्ति) दुर्बल झालेला असतो व मनुष्यांची शरीरे दुर्बल झालेली असतात. तशात वर्षा ऋतूमध्ये दोषांचा अधिकच प्रकोप झाल्याने अग्नी अधिकच मंद होतो आणि मंदाग्नि मुळे दोषप्रकोप अधिकच वाढतो. असे विश्चक्र सुरु होते. यामुळे भूक मंदावणे पचनाचे विकार आणि वात विकार देखिल डोकं वर काढतात. 

   तसेच ग्रीष्म ऋतूत तप्त झालेल्या भूमीवर पावसाचे पाणी पडल्याने जे बाष्प तयार होते व सतत पावसाची धार लागते त्यामुळे जल हे आम्ल विपाकी बनते.

  ऋतुचर्येचे तीन प्रमुख विभाग आहेत. 

     आहार, विहार आणि औषध. 

     

आहार  : वर्षा ऋतू मध्ये प्रकुपित दोष व कमकुवत झालेले पचन बघता, आहार अतिशय सांभाळावा लागतो. 

   अपथ्य / वर्ज्य/ खाऊ नये असे : 

साधारण पित्त आणि वात वाढेल असे कोणतेही पदार्थ त्याज्य समजावे. तरी ढोबळ यादी खाली देत आहे. 

१. पाण्यात मिसळलेले सातू 

२. पालेभाज्या जपून खाव्या. पालेभाज्या खाण्याचा अट्टाहास नसावा. 

३. नदीचे पाणी. 

४. चमचमीत सगळेच पदार्थ या ऋतूत  खावेसे वाटले तरी असे सर्व पदार्थ पित्तकर असतात त्यामुळे त्यांचे सेवन टाळावे. लोणचे, पापड, इत्यादी. 

५. सुके मांस. सुकवलेले मांस हे आयुर्वेदात त्याज्य मानले आहे. कारण त्यामुळे सर्व दोष प्रकोप होतो. 

६. ज्या दिवशी ढग दाटून राहिले आहेत आणि सूर्यदर्शन होत नसते त्या दिवशी शक्यतो पूर्ण भोजन करू नये. खायचे च झाल्यास लघु आणि गरम (स्पर्शाने) आहार घ्यावा. 

७. आहारात फळांच्या समावेशाचा अट्टाहास नसावा. फळे खायचीच झाल्यास हंगामी, स्थानिक व नैसर्गीक रित्या पिकलेली खावीत. 


 पथ्य / सेवन करण्यास योग्य :

१. मध: "पान भोजन संस्कारान् प्रायः     क्षौद्रान्वितान् भजेत् |"

    खाण्या पिण्याच्या सर्व पदार्थांसोबत योग्य मात्रेत मधाचा उपयोग अवश्य करावा. पण तो अल्प प्रमाणात हवा. अधिक मात्रेत मध घेतल्यास अत्यंत घातक अजीर्ण होते. अशा अल्प प्रमाणात सेवन केलेल्या मधाने वर्षा ऋतूमध्ये उत्पन्न होणाऱ्या अन्नातील क्लेदाचे पचन होते. (चक्रपाणी टीका)

२. "व्यक्ताम्ल लवण स्नेहं वातवर्षाकुले अहानि |"

     ~ विशेषतः अम्ल, लवण( खारट) व स्निग्ध पदार्थाचा भोजनात वापर केला पाहिजे. परंतु विदाह निर्माण करणारे नसावे. (उदाहरण: लोणचे,पापड, इत्यादी नको.)

३. जुने यव, गहू, षष्टी शाळी यांचे सेवन करावे. नवीन धान्य टाळावे. 

४. उकळून गार केलेले पाणी. 

५. विहिरीचे पाणी. 

६. मांसरस (सूप) किंवा मुगाचे यूष (कढण) यांसोबत यव आदि जुने धान्य सेवन करावे.  

७. सुंठ सतत रोजच्या भोजनात वापरावी. 


  विहार / उपक्रम: 

१. दिवस झोपू नये. 

२. दव पडलेल्या स्थानी वावरू नये. 

३. व्यायाम : (अति मात्रेत) करू नये. आधीच्या आदानकाळातील बल हानी लक्षात घेता. 

४. उन्हात बसणे टाळावे 

५. व्यवाय (शरीर संबंध) टाळावे 

६. शरीराला उटणे लावावे. 

७. सुगंधी द्रव्यांनी स्नान करावे. 

८. हलके, स्वच्छ, कोरडे वस्त्र धारण करावे. 

९. राहण्याचे ठिकाण स्वच्छ व कोरडे असावे. 

१०. घरात व कामाच्या ठिकाणी धूपन द्रव्यांनी धूपन करावे. 

११. पावसात भिजणे टाळावे. भिजल्यास त्वरित केस पुसून गरम पाण्याने स्नान करावे. 


 तिसरा भाग ऋतुचर्येचा म्हणजे औषध :

      व्यक्तिपरत्वे प्रकृति व व्याधी आणि समस्या वेगवेगळ्या असतात. या सगळ्या सूक्ष्मातीसूक्ष्म संकल्पनांचा विचार आयुर्वेदात केल्या गेलेला असल्याने कुठलेही औषध हे मात्र तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. 

      

     या ऋतूमध्ये जरी सुरुवातीला शरीर बळ दुर्बल असले तरी, चंद्राचे अधिपत्य असते. व गार वारा, पाऊस, यांच्या योगाने पृथ्वीतील उष्णता कमी होऊन स्निग्ध अम्ल, लवण, मधुर रस पुष्ट होत असतात. त्यामुळे निसर्ग हा बळ देत असतो. विसर्ग काळ बळ देणारा असतो , आणि ते बळ कसे घ्यायचे हे समजावणारा #आयुर्वेद आपल्याला लाभला आहे...! 

     प्रकृति भरभरून आपल्याला द्यायला उभी सज्ज आहे... आपली झोळी दुबळी न करता आयुर्वेदाने ती भरून घेऊ.... 

      मनाच्या उत्साहापेक्षा आणि मनाच्या शक्ति पेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट तत्परतेने व्याधीक्षमत्व / immunity वाढवू शकत नाही. unlocking च्या साखळीमध्ये त्याच उत्साहाने आणि शक्तीने आलेल्या संक्रमणाला मनातून पण unlock करूया आणि आयुर्वेदीय जीवनशैलीचा मार्ग अवलंबून निर्भय राहूया.

Dr. Kanchan S. Khachane
Dr. Kanchan S. Khachane
B.A.M.S. (Ayurvedacharya)